Type Here to Get Search Results !

कळंब नगरपरिषदेकडून घरकुल वाटपात गैरप्रकार? आमरण उपोषणाचा इशारा



कळंब न्यूज प्रतिनिधी 

  शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नगरपरिषदेकडून घरकुलांचे वाटप करण्यात येत असून यामध्ये मोठा गैरव्यवहार होताहे.तात्काळ कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा तक्रारदार खादीम सय्यद यांनी दिला आहे.या तक्रारींमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या योजनेचा मूळ उद्देश गरीब व उपेक्षित घटकांना घर बांधणीसाठी मदत करून स्वतःचे घर उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र या योजनेतच बोगस घरकुल वाटप झाल्याची चर्चा सध्या जोर धरत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही लाभार्थ्यांकडे आधीपासूनच आर.सी.सी. बांधकाम असलेली घरे असून, दोन मजली घरे असणाऱ्यांनादेखील घरकुल योजना मिळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खर्‍या गरीब व बेघरांना या योजनेचा लाभ न मिळता सक्षम लोकांच्या खिशात तो जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या संदर्भात तक्रारदार खादीम सय्यद यांनी एप्रिल महिन्यातच नगरपरिषदेकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, अजूनपर्यंत त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सय्यद यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद कळंब यांची भेट घेण्यासाठी दोन-तीन वेळा प्रयत्न केले, परंतु त्यांना भेट घेता आली नाही. नगरपरिषद प्रशासन कारवाई करण्याऐवजी संबंधितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नगरपरिषद कळंब यांच्याकडून कारवाईत होत नसल्याकारणाने त्यांनी पुराव्यासाहित जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे  तक्रार दाखल केल्याची माहिती देखील त्यांनी दिली. याबाबत बोलताना सय्यद यांनी सांगितले की, "हे फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. जर नगरपरिषदेकडून वाटप केलेल्या सर्व घरकुल वाटपाची चौकशी झाली तर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघड होण्याची शक्यता आहे." त्यांनी पुढे इशारा दिला की, "संबंधित व्यक्तींवर तातडीने कारवाई न झाल्यास आम्ही आमरण उपोषण करण्याचा मार्ग अवलंबू."या सर्व प्रकरणामुळे नगरपरिषद प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांनी सर्व अर्जांची पुनर्पडताळणी करून पात्र नसलेल्या लाभार्थ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments